शिर्डी - गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.
शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील १४ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
“पाच वर्षांपूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती.” असे वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला पन्नास वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहेत. पाण्याचा एक – एक थेंब अमूल्य आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.
श्री साईबाबा मंदिर दर्शन रांगेचे आज लोकार्पण झाले. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देश – विदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment