दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेत कमी प्रदूषण करणारे फटाके फोडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2023

दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेत कमी प्रदूषण करणारे फटाके फोडा


मुंबई - हवामानातील बदलामुळे वायू प्रदूषण वाढले आहे, ही बाब लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना शासनाने तसेच महानगरपालिकेने हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवाळी सणामध्ये रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडण्याचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने देखील दिले आहेत. या निर्देशांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे, तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. दीपावलीनिमित्त मुंबईकरांना महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात आयुक्त चहल यांनी नमूद केले आहे की, आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वांना प्रिय असा दीपावली सण सुरू झाला आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सव आपल्याला चांगले आणि योग्य वागण्याची शिकवण देतो. यंदाचा दीपोत्सव सुरू झाला आहे. यंदाच्या दीपावलीमध्ये मुंबईकरांकडून विशेष असे सहकार्य अपेक्षित आहे. ते म्हणजे, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, यंदाच्या दीपोत्सवात रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. शक्यतोवर, कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असे विनम्र आवाहन देखील यानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी केले आहे. 

हे आवाहन करण्यामागील कारण स्पष्ट करताना आयुक्त चहल म्हणाले की, वातावरणीय बदल, त्यासोबत बांधकामांमधून उडणारी धूळ आणि इतर कारणांनी वायू प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कार्यवाहीला फक्त शासकीय कामकाजापुरते मर्यादित न ठेवता त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. कारण लोकचळवळीतून केलेले कामकाज नक्कीच यशस्वी होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत. विशेषतः प्रदूषण वाढीतील मोठा घटक ठरत असलेली धूळ पसरु नये म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम देखील दिसत आहे. असे असले तरी, एकट्या महाराष्ट्र शासनाने किंवा महानगरपालिकेने प्रयत्न करून चालणार नाही. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्व नागरिकांचे सहकार्य आणि सहभागाची जोड मिळाली तर प्रदूषण निश्चितच रोखता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

त्यापुढे ते म्हणाले की, माननीय उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दीपावली सणामध्ये नागरिकांनी रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

उच्च न्यायालय व महानगरपालिकेने प्रसारित केलेले विविध निर्देश, सूचना यांचे सर्व नागरिकांनी पालन केले तर वायू प्रदूषण टाळणे शक्य होईल. कोविड कालावधीमध्ये देखील महानगरपालिकेच्या विनंतीमुळे मुंबईकरांनी फटाके फोडणे टाळले होते, अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता, याचे स्मरण करुन देत तशाच प्रकारचे सहकार्य यंदा दिवाळी सणामध्ये करावे, अशी अपेक्षा देखील चहल यांनी अखेरीस व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad