Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, मेट्रो २अ आणि ७ रात्री ११ वाजेपर्यंत


मुंबई - मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. या निर्णयानुसार शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ पर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे. 

मुंबईकर प्रवाशांच्या हिताचा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, 'दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे. दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात ती एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो नागरीक आपली मेट्रोने सुखकर असा प्रवास करू लागले आहेत. तिच्यामुळे नागरीकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. मेट्रोची वेळ आल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.पर्यावरणपूरक आणि इंधन, वेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो आपल्या मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

मुंबई मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेर पश्चिम  दरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

'मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आत्तापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केलं आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना राबवत आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णय देखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल ,'असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom