मुंबईत प्रदूषण - ३ दिवसात ४ लाख ७१ हजार दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत प्रदूषण - ३ दिवसात ४ लाख ७१ हजार दंड वसूल

Share This

मुंबई - मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. बांधकाम - पाडकामाचा राडारोडा (डेब्रिज) वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही महानगरपालिकेने सक्त मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरु राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना राबवण्याची सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर विविध कामे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये सरकारी, निमसरकारीसह खासगी बांधकामांद्वारे होणारे वायू प्रदूषण तसेच धूळ नियंत्रण कामे याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे पालन न करणा-या संबंधितांवर सक्त कारवाईचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. 

महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत  जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी, परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम मलबा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांनी या कामी भरारी पथके गठीत केली आहेत. 

हवा गुणवत्ता निर्देशांकनुसार धुळीचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्म धूलिकण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने दंडात्मक उपाययोजना देखील आता करण्यात येत आहेत. राडारोडा वाहून नेणारी वाहने, बांधकाम ठिकाणे व त्याजवळील सार्वजनिक ठिकाणे येथे आवश्यक ती उपाययोजना न राबविल्यामुळे झालेले प्रदूषण यावर नियंत्रण आणणे, हा यामागील उद्देश आहे.

असा वसूल करण्यात आला दंड - 
राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड तीन दिवसात वसूल करण्यात आला आहे. यामध्ये, जी दक्षिण विभागात १५ हजार रुपये, पी उत्तर विभागात ८० हजार रुपये, एन विभागात ७० हजार रुपये, एस विभागात ४५ हजार ६९२ रुपये, टी विभागात ५० हजार रुपये , पी दक्षिण विभागात १३ हजार रुपये, के पश्चिम विभागात १० हजार रुपये, एफ उत्तर विभागात ४५ हजार रुपये, जी उत्तर विभागात १० हजार रुपये असा एकूण ४ लाख ७१हजार ६९२ रुपयांचा दंड रकमेचा समावेश आहे. 

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा - 
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जावे. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरु राहणार आहे. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि हरित मुंबई ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांची देखील आहे.
- डॉ. इकबाल सिंह चहल 
महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक

परिमंडळ निहाय दंड रकमेची आकडेवारी - 
परिमंडळ १ - निरंक
परिमंडळ २ - ७० हजार रुपये 
परिमंडळ ३ - ५३ हजार ५०० रुपये 
परिमंडळ ४ - १ लाख ३ हजार रुपये 
परिमंडळ ५ - ५६ हजार ५०० रुपये 
परिमंडळ ६ - १ लाख ६३ हजार ६९२ रुपये 
परिमंडळ ७ - २५ हजार रुपये 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages