आरोपी ऋषिकेश बेदरे यांना शरद पवार यांचा पाठींबा आहे का ? - ज्योती वाघमारे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2023

आरोपी ऋषिकेश बेदरे यांना शरद पवार यांचा पाठींबा आहे का ? - ज्योती वाघमारे


मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान दगडफेक केली म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेला व ऍट्रॉसिटी, खंडणी आणि मारहाणीसारखे गंभीर आरोप असलेला आरोपी ऋषिकेश बेदरे याचा शरद पवारांसोबतचा फोटो व्हायरल होतो. यावरून
ऋषिकेश बेदरे यांना शरद पवार यांचा पाठींबा  होता का असा प्रश्न शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी करण्याची मागणीही ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे या बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना, छत्रपती शिवरायांच्या, महात्मा फुलेंच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या या पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक वीण उसविण्याचा प्रयत्न समाजातील काही विघातक प्रवुत्तीतून सातत्याने केला जात आहे. महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा कट शिजतोय असे आरोप उबाठा नेते संजय राऊत, अदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे  जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्याकडून वारंवार केले जात आहेत आणि दुसरीकडे मराठा आंदोलनादरम्यान दगडफेक केली म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेला व ऍट्रॉसिटी, खंडणी आणि मारहाणीसारखे गंभीर आरोप असलेला आरोपी ऋषिकेश बेदरे याचा शरद पवारांसोबतचा फोटो व्हायरल होतो. हा आरोपी पवारांसोबत काय करत आहे. १ तारखेला मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक होते, महिला पोलीस जखमी होतात. आरोपीना अटक केली जाते, तर दुसरीकडे ३ तारखेला अटक केलेला आरोपी शरद पवारांची भेट घेतो. ही भेट शाबासकीची थाप घेण्यासाठी किंवा बक्षिशी घेण्यासाठी होती का? असा सवाल ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला.  

मराठा समाजाच्या शांततेत चालणाऱ्या आंदोलनात दगडफेक करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. एका बाजूला महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रक्ताचे पाणी करत आहेत. तर दुसरीकडे सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले विरोधक जातीजातींमध्ये विष पेरून दंगली घडवून समाजातील लोकांचे रक्त पाण्यासारखे सांडत आहेत. हे छुपे वार आहेत कि छुपे पवार आहेत? असा सवालही  वाघमारे यांनी उपस्थित केला.  

त्या पुढे म्हणाल्या की, जातीपातींमध्ये विष कालवून, मराठा आंदोलनादरम्यान दगडफेक झाली. त्याचा मास्टरमाइंड कोण होता आणि मास्टर हँन्डलर कोण होता. हा मास्टर हॅन्डलर मुंबईतील होता असा आम्हाला विश्वास आहे. पण तो मातोश्रीमध्ये होता की सिल्वर ओक मध्ये होता याबद्दल गृहखात्याने सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.  कारण जातीय दंगली घडवून  आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हाच विरोधकांचा डाव आहे. यांना कोणत्याही समाजाच्या सुखदुःखाशी देणं घेणं नाही. यांना फक्त आपला स्वार्थ प्यारा आहे. फक्त प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्यातच विरोधक मश्गुल आहेत अशी टीका वाघमारे यांनी केली.

महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या राजकारणाला बळी पडणार नाही. महाराष्ट्राचे राजकारण एवढं रसातळाला नेण्याचे पाप विरोधकांकडून होतंय. त्याचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांना स्मरून घेतलेली आहे आणि ती शपथ ते नक्की पूर्ण करतील याचा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पण, या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याचाच महाराष्ट्र दंगल आघाडीचा डाव आहे. पण त्यांचा हा डाव आम्ही सक्षमपणे परतवून लावू याचा आम्हाला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad