Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत सुविधांच्या रूपाने मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीजेची ओवाळणी


मुंबई - स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द खरा करीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी वसाहतीत जात त्यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. या वसाहती प्रमाणेच सर्व ४६ वसाहतींमध्ये सुविधा पुरवल्या जातील. फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन २९ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ होईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांची पाहणी तसेच स्वच्छता कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कासारवाडी कामगार वसाहत दादर येथे आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि डॉ. सुधाकर शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि अभ्यासिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या वसाहती मध्ये भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचा शब्द आपण दिला होता. तो पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचे आरोग्य चांगले ठेवणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहावे म्हणून त्यावेळी भेट दिली होती. त्यांच्या मुलांनाही उच्च शिक्षण घेता आले पाहिजे, विविध स्पर्धा परीक्षासाठी या मुलांसाठी योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य परिस्थितीत राहणारी मुले मोठ्या पदावर जावीत यासाठी अभ्यासिका उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एकूण ४६ वसाहतीत अशा प्रकारच्या सोयीसुविधा देणारे काम करणार आहोत.महापालिका यंत्रणेने कमी कालावधीत चांगले काम केले आहे. अशा वसाहतीत २९ हजार कर्मचारी राहतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपला दवाखाना माध्यमातून वसाहतीत चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत आतापर्यंत २०० दवाखाने सुरू केले आहेत. ३६ लाख लोकांनी  याठिकाणी उपचार घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. 

हक्काची घरे या कर्मचाऱ्यांना मिळावीत यासाठी आपण प्रयत्न करतोय. तोपर्यंत चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन हे सर्वसामान्यांचं असून त्यांच्यासाठी काम करत आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा यांच्यासाठी काम करत आहे. काल गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलीस बांधवांसोवत दिवाळी साजरी केली. आज स्वच्छता कर्मचारी बांधवांच्या वसाहतीत  दिवाळी साजरी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अशा वसाहतीतील मुलांना मैदान पाहिजे. उद्यान पाहिजे, सध्याची ही परिस्थिती बदलली पाहिजे या उद्देशाने काम सुरू केले आहे. आपण ठरवले तर काम होऊ शकते. सुधारणा होऊ शकतात. दोन महिन्यात कामे पूर्ण होतील, असा शब्द यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी केले. कासारवाडी येथे सुसज्ज उद्यान, उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खेळाचे मैदान, नवीन जल जोडणी आदी कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom