औरंगाबाद - मोदींना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी व्हावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
लोकसभेमध्ये काँग्रेससहीत कोणत्याच पक्षाची स्वबळावर पंतप्रधान निवडून आणण्याची ताकद नाही. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच करण्यात अर्थ नाही. विधानसभेत मुख्यमंत्री होण्याची ताकद या पक्षात आहे, त्यावेळी जागावाटपा साठी भांडू, पण आता ती वेळ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. दोन पक्ष फुटिमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसचा मागच्यावेळी एकच खासदार होता. त्यामुळे हे तीनही पक्ष पर्याय होऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मागच्या लोकसभा निवडणुकीतून अस दिसून आले आहे की, वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षांत वंचित चा जनाधार वाढला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणुकीत मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे. कोणीही अती आत्मविश्र्वास बाळगू नये सध्या तशी परिस्थीती नाही, असा सल्ला ही त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला आहे.
विरोधकांनी मोदींना सत्तेतून हरवले नाही तर जेल मध्ये जावे लागेल. सत्तेवर असताना छोट्या मोठ्या चुका होतात त्यामुळे जेल मध्ये टाकण्याची आवश्यकता नसते. मोदी शहा ज्या प्रमाणे वागत आहेत, ते योग्य नाही. असेही त्यांनी यावेळी म्हटले.
योग्य काळात निर्णय व्हायला पाहिजे. उरलेले तीन पक्ष हे सवर्ण लोकांचे पक्ष आहेत, संविधान बदललं तर यांना फार फरक पडणार नाही. कारण सवर्ण समाजाला सुरक्षा देण्याचेचं मोदीचे धोरण आहे. संविधानातील बदलामुळे शूद्र, अतिशूद्र, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलीत, मुस्लिम, वंचितांना आणि अल्पसख्याकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल. म्हणून वंचितांच्या आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा ईशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युलामध्ये आमची भूमिका अशी आहे की, आमच्या वाट्याला आलेल्या 12 जागांपैकी कमीत कमी 3 उमेदवार हे मुस्लीम राहतील. ज्या समुहासाठी वंचित बहुजन आघाडी राजकीय भूमिका घेत आहे. ते जे वंचित समूह ओबीसी, व्ही.जे.एनटी यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ जे इतर प्रस्तापित पक्ष देत नाहीत.
आमची भावना हीच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन लढल पाहिजे. केंद्रात मोदीला पराभूत करणं हा अजेंडा समोर ठेवून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे हिच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची भूमिका असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. सगळ्यांनी एकत्र आल पाहिजे आणि समसमान वाटणी करून एका ध्येयाने लढल पाहिजे. यात जर वेळ वाया गेला तर आम्हाला वंचित समुहांसाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. ती घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
आमची भूमिका ही आहे की, वंचित बहुजन आघाडीची राज्यभरात मोठी ताकद आहे जी मागच्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१९ मध्ये बूथ लेवल पर्यंत संपर्क नव्हता. आज गाव खेड्या पर्यंत आमच्या शाखा आहेत. दलीत, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी आमच्याकडे आहेत. कुठलंही भावनिक वातावरण नसताना लाखांच्या सभा आमच्या होतात. ते आम्ही अनेक जिल्ह्यांत आणि पाचही विभागात सिद्ध केलं आहे. रस्त्यावर येऊन आम्ही ताकद दाखवली आहे. आता जागेवरून भांडण्यापेक्षा आपण एका धेय्यासाठी एकत्र येऊन समसमान जागा वाटप करू आणि ताकदीने मोदींचा पराभव करू अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रवक्ते फारुक अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment