मुंबई - मुंबई सुरक्षित असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसातच मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये अंधाधुंद गोळीबार झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये एकाने आज (24 डिसेंबर) दुपारी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सोळा ते सतरा राऊंड फायर झाल्याचं सांगितलं जात आहे. एका गुंडाचा दुस-याशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला आणि नंतर गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेत तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेतील जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.
एकाचा मृत्यू -
दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले असून वेगाने तपासकार्य सुरु आहे. ज्या भागात हा गोळीबार झाला तो रहिवासी भाग आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या घटनेमध्ये सुमित येरुणकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपींची ओळख पटली असून 9 पथके तयार करण्यात आली असून ते आरोपींचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment