मुंबईमध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2024

मुंबईमध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार - मुख्यमंत्री


मुंबई - शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबईमध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

डीप क्लिन ड्राइव्हअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव वल्लभ छेद रस्ता, नाना - नानी उद्यान, नॅन्सी  कॉलनी, सावरकर नगर, दहिसर पूर्व, सिंह इस्टेट, मार्ग क्र. ०२ ठाकूर गाव, कांदिवली पूर्व, दफ्तरी मार्ग, मालाड पूर्व, तपोवन मालाड पूर्व येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेतला. या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धेश कदम यांनी वडारपाडा, कांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली. तसेच बुवा साळवी मैदान, दिंडोशी येथील  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण केले. स्वच्छ्ता मोहीम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अतुल भातखळकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

स्वच्छता मोहीम व्यापक लोकचळवळ -
स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मुंबईत राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, सामाजिक संस्था, मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. स्वच्छता मोहीम आता व्यापक लोक चळवळ बनली आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. लोकांनी हातात घेतलेली स्वच्छतेचे अभियान लोक चळवळ बनून यशस्वी होत आहे. या अभियानात यापुढे सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचे महत्त्व आता सर्वांना कळत आहे. ही चळवळ फक्त सरकारची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे. स्वच्छता अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणात घट -
मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली आली आहे हे या अभियानाचे यश म्हणावे लागेल. याचे सारे श्रेय मुंबईच्या सफाई कामगार व अभियानात सहभागी होत असलेल्या मुंबईकरांचे आहे. स्वच्छ्ता अभियान सतत चालणारे अभियान आहे. यापुढे या अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना -
आजच्या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी आजोबा पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांकडून ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपला आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू करण्यात येत असून लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

कांदिवली पूर्व येथे मुख्यमंत्र्यांचा शिक्षक व जनतेशी संवाद -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज समोरील सिंग इस्टेट रोड नं. २ ची पाहणी करून उपस्थित शिक्षक व जनतेची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह बाबत माहिती दिली. स्वच्छता हा आरोग्याचा मुलमंत्र घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील लोकांच्या घरा संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्न संदर्भात आनंद महिंद्रा यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नातून मार्ग काढला जाईल. वन विभागाकडील प्रश्नाबाबत वनविभागाच्या सचिवांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे सांगून  शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात ही बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन - 
सिद्धेश कदम यांनी वडारपाडा कांदिवली येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या शिबिराचे उद्घाटन केले. या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. 

मुंबईत २५० आपला दवाखाने सुरू करणार- 
दिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात  सुरू करण्यात आलेल्या हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्ष, चिकित्सा कक्ष, औषध निर्माता कक्ष, नर्सिंग रूम या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत 202 दवाखाने सुरू झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लघु अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आणि शारदाबाई गोविंद पवार गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच दहिसर पूर्व येथे हुनमान मंदिरात मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad