विनापरवाना होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावू नका, पालिकेकडून आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2024

विनापरवाना होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावू नका, पालिकेकडून आवाहन


मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरे परिसरातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर पूर्व परवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मुंबई महानगरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर काढण्याची मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून वेळावेळी राबविण्यात येते, तसेच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येते. तथापि, नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात फलकांची यादी नागरिकांकरीता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

उच्च न्यायालयामध्ये दाखल जनहित याचिका क्रमांक ३७/२०१० व १५५/२०११ यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर लावण्यास मनाई आहे. याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी गठित राज्यस्तरीय समितीची बैठक अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई आहे.

विना परवानगी होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावणाऱया व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतूदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतूदींचा भंग करताना आढळल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad