Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी


राहुरी/मुंबई - महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी  प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान माझ्यासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आजोबा आणि वडीलांकडून मिळालेल्या संस्कारांचा आणि विचारांचा हा गौरव आहे. विखे पाटील परीवाराने दतक घेतलेल्या २०८ शेतकरी कुटूबियांना हा सन्मान समर्पित करीत असल्याची भावना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते राहुरी  येथे बोलत होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित ३७व्या दिक्षांत समारंभात आज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे विखे पाटील हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, विद्यापीठाने केलेला सन्मान अभिमान वाटावा असाच असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापुर्वी माझे आजोबा आणि सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांना २२ ऑक्टोबर १९७८ रोजी आणि वडील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांना २९ नोव्हेंबर २०१२ रोजी या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित केले होते, याची आठवण करून देत या दोघानीही शेती आणि शेतकाऱ्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्यच समर्पित केले होते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे जाताना कोणत्याही पदावर असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी कायम राहीली  असल्याचे त्यांनी सांगितले.

२०८ दत्तक शेतकरी कुटूबियांना सन्मान समर्पित -
विखे पाटील परीवाराचा डीएनए हा शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा आहे. या जिल्ह्यातील २०८ शेतकरी कुटूबियांना दत्तक घेवून त्यांच्या परीवारासाठी काम करण्याची सामाजिक बांधिलकी आजही जोपासली आहे. मिळालेला सन्मान या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करीत असल्याची विखे पाटील यांनी अतिशय भावनिकतेने सांगितले.

कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान सोहळ्यास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते. कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांच्या हस्ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण  विभागाचे माजी सचिव आर एस परोदा उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित केल्याबद्दल प्रवरा परीवारातील सर्व संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom