मुंबई पालिका कर्मचारी लावतात बोगस बायोमेट्रिक हजेरी, आयुक्तांकडे कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2024

मुंबई पालिका कर्मचारी लावतात बोगस बायोमेट्रिक हजेरी, आयुक्तांकडे कारवाईची मागणी


मुंबई - बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी होत असून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत पालिकेने याची कबुली दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या बायोमेट्रिक हजेरीचा घोळाबाबत कारवाई करत कठोर उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षात बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती विचारली होती. पालिकेच्या मुख्यालय परिरक्षण खात्याने अनिल गलगली यांस सफाई कामगार रमेश सोळंखी, ज्योती घुगल आणि सुहास कासारे यांची माहिती उपलब्ध करुन दिली. सुहास कासारे याने स्वतःच्या हजेरीबरोबर रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल यांची हजेरी लावली. त्यावेळी रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बायोमेट्रिक यंत्राजवळ दिसून येत नव्हते. पालिकेने या तिघांना ज्ञाप दिले पण आजमितीला कोणतीही कारवाई केली नाही. अन्य कोणत्याही खात्याने अजून माहिती दिली नाही.

अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांस पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की पालिका मुख्यालय असो की अन्य पालिकेचे कार्यालय सर्वत्र असा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. नमूद प्रकरणात कोणतीच कारवाई न झाल्याने असे प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बायोमेट्रिक हजेरी अत्याधुनिक यंत्रणा असली तरी याचा दुरुपयोग होत आहे, बोगस हजेरी लावली जात आहे. भविष्यात यात सुधारणा करत बोगसगिरी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर आणि कडक कारवाई केल्यास कोणीही चूक करणार नाही. तसेच जे अश्या प्रकरणात आढळून येतात त्यांच्यावर कारवाई करत त्याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad