मुंबई - मुंबईनंतर आता राज्यातील लहान-मोठ्या अशा सर्वच शहरांमध्ये महा स्वच्छता अभियान (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) सुरू करण्यात येत आहे. मोठ्या ऊर्जेसह स्वच्छता अभियानाची ठिकठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या स्वच्छता अभियानाचा फायदा नागरिकांचे आरोग्य सुधारणेसाठी होणार आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत विविध ठिकाणी 'मॉर्निंग वॉक' करिता नागरिक येतात, अशा परिसरांमध्ये नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दिनांक ६ जानेवारी २०२४) सहभागी झाले. तसेच मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱयाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मार्गावरील कामे, त्याचप्रमाणे, मुंबई पारबंदर प्रकल्प यांची देखील मुख्यमंत्री महोदयांनी पाहणी केली. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार यामिनी यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहपोलीस आयुक्त प्रदीप पडवळ, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीत हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्यासह संबंधित सहायक आयुक्त, खातेप्रमुख आदी मान्यवर या दौऱयास उपस्थित होते.
मुंबईत विविध प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने, प्रधानमंत्री मोदी हे मार्गक्रमण करणार असलेल्या परिसरातील आवश्यक कामांची तसेच संपूर्ण स्वच्छता मोहिमेची देखील पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रारंभी, 'ए' विभागातील कुलाबा भागामध्ये आयएनएस शिक्रा परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमितपणे सर्व परिसरांमध्ये स्वच्छता ठेवावी, तसेच रस्ते धूळमुक्त करुन पाण्याने धुवून काढण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी केली. सर्व रस्त्यांवरील बस थांबे, आजुबाजूचा परिसरही नियमितपणे स्वच्छ करावी. शक्य तिथे रंगरंगोटी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. आयएनएस शिक्रा परिसरामध्ये स्वच्छता कर्मचाऱयांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी दैनंदिन स्वच्छता कार्यवाहीची माहिती घेतली.
त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे यांनी 'बी' विभागातील पूर्व मुक्त मार्गाचा प्रारंभ होतो, त्या परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगारांसोबतही त्यांनी संवाद साधला. पूर्व मुक्त मार्गावरुन येणारी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सदर परिसरातील रस्ते पाण्याने नियमितपणे धुवावेत, जेणेकरुन धूळ साचणार नाही, अशी सूचना त्यांनी केली. तसेच मुंबई वाहतूक पोलिसांना या परिसरातील बेवारस व अडथळा ठरणारी वाहने हटवण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन त्या-त्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करता येईल, असे याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यानंतर, पुढे ई विभागाच्या हद्दीत असलेल्या पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक पोलीस चौकी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव यादेखील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या. त्यापुढे एफ दक्षिण विभागाच्या हद्दीत गाडी अड्डा येथेही स्वच्छता विषयक कामांची तसेच मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी- न्हावा शेवा सागरी रस्ता) याची पाहणी केली.
No comments:
Post a Comment