![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLvyOxQec0bPd5viZkM_ylAHbPZTWAmlLnBoeojh8ZT6L1Twc_D1lUxwmitw-cezokm19kuqtIL_B-A4f1h-sZggM5996wT5K0yJNK9iNrXdrxDx8K_iTV_ceH7-QUxo1CS1hl0VMb0QXniV017_GZidq35lA6Q29wUH07ji7FxpCQ2E1bNjDsh8e9PqdD/w640-h480/bmc%20head%20office%20(1).jpg)
मुंबई - मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे बेकायदा बोर्ड, बॅनर्स, फलक लावले जातात. यामुळे मुंबई विद्रूप होते. मुंबईचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी बेकायदा बोर्ड, बॅनर्स, फलक प्रिंट करून देणाऱ्या व्यावसायिकांना थेट नोटीस बजावा, असे सक्त आदेश मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अनधिकृत बॅनर्स, बेवारस वाहने, अतिक्रमण हटावण्याची मोहीम अधिक तीव्र करा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते करण्यावर भर दिला जात आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वच्छ मुंबई, मुंबई अभियानांतर्गत मुंबईतील पदपथावर बेकायदा कब्जा करणारे, अतिक्रमण, रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा वाहने जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेने बेकायदा फेरीवाले, अतिक्रमण या विरोधात कारवाईला वेग दिला आहे. मात्र आता बेकायदा बोर्ड, बॅनर्स प्रिंट करणारे रडारवर आले असून, फलक, पोस्टर्स बॅनर्स प्रिंट करून देणाऱ्या व्यवसायिकांना थेट नोटीस बजावा, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
अनधिकृत बॅनर्स, बेवारस वाहने, अतिक्रमण हटवा -
पालिका हद्दीत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई करावी. पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सतत सुरू असते; मात्र यापुढे या कारवाईला वेग देण्यात यावा, त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत लागली तरी घ्या. सर्व कारवाई करताना पालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांतील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. सहभागी सर्व संबंधित विभागांनी दररोज जी कारवाई केली, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असे आदेश जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. याबाबत पालिका मुख्यालयात नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी कारवाई तीव्र करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी उपयुक्त (विशेष) संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण निर्मूलन मृदुला अंडे यांसह लायसन्स विभागातील अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment