तपासणीत कोस्टल रोड पास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2024

तपासणीत कोस्टल रोड पास


मुंबई - वरळी थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनची एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी एका मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. वाहतुकीसाठी रस्ता मजबूत आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यात कोस्टल रोड पास झाला आहे. त्यामुळे एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्यासाठी लोकार्पणाची तयारी ही पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा ऑक्टोबर २०१८ मध्ये शुभारंभ झाला. त्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रकल्पाचे काम मंदावले होते; मात्र २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आणि कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली असून, सद्यस्थितीत ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण कोस्टल रोड १५ मेपासून मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे. परंतु थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु प्रवासी वाहतुकीसाठी रस्ता मजबूत आहे का याची तपासणी करण्यासाठी २५ टन वजनाचे १२ ट्रक हाजी अली येथील पुलावर सलग ७२ तास उभे करण्यात आले होते. तपासणीत रस्ता मजबूत असल्याचे स्पष्ट झाल्याने चार लेनची एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्यात येणार आहे.

‘अशी’ होतेय लोकार्पणाची तयारी -
कोस्टल रोडच्या लोकार्पणच्या पार्श्वभूमीवर मार्गावर दिशादर्शक फलक लावणे, लाइटचे काम, मार्गावर आवश्यक मार्किंग करणे अशी कामे केली जात आहेत. या मार्गावरील इंटरचेंजवर वेग मर्यादा ४० किमी प्रति तास तर मेन रोडवर ८० किमी प्रति तास वेग राहणार आहे. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी राहील.

‘अशी’ झाली तपासणी -
हाजी अली जवळील दोन लेनचा आणि १.२ किमीचा चार लेनचा कोस्टल रोडवरील सर्वात जास्त लांबीच्या पुलावर २५ टन वजनाचे १२ ट्रक एकूण तीनशे टनांचे ट्रक ठेवण्यात आले. सुरुवातीला २५ टक्के, यानंतर ५० टक्के आणि यानंतर १०० टक्के असे वजन वाढवून ३०० टनांचे बारा ट्रक शनिवार, रविवार आणि सोमवार असे ७२ तास ठेवण्यात आले. यानंतर २५ टक्के, ५० टक्के आणि यानंतर १०० टक्के वजन घटवण्यात आले. ही टेस्टिंग यशस्वी ठरली. या ट्रकमध्ये लोखंड, मोठे दगडांनी वजन वाढवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad