प्रकाश पुराणिक ट्रॉफीसाठी महिलांचे टी-२० द्वंद्व - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2024

प्रकाश पुराणिक ट्रॉफीसाठी महिलांचे टी-२० द्वंद्व


मुंबई - माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी सांभाळणार्‍या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या क्रिकेट आणि संघटन कौशल्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही दिग्गज संस्थांनी एकत्र येऊन प्रकाश पुराणिक स्मृती करंडक स्पर्धेचे सलग दुसर्‍या वर्षीही आयोजन केले आहे. या स्मृती करंडकासाठी १६ महिला संघाचे टी-२० द्वंद्व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) चार ग्राऊंड्सवर २० ते २३ फेब्रूवारीदरम्यान रंगणार आहे.

स्वत: उत्तम क्रिकेटपटू असलेल्या दिवंगत प्रकाश पुराणिक यांनी माहिम ज्युवेनाईल आणि शिवाजी पार्क जिमखाना या दोन्ही क्लबचा कार्यभार यशस्वीपणे हाताळला होता. त्यांचे क्रिकेटप्रेम आणि त्यांच्या क्लब कारकीर्दीला सलाम ठोकण्यासाठी हे दोन्ही क्लब एकत्र आले आणि त्यांनी गेल्या वर्षापासून प्रकाश पुराणिक स्मृती करंडक स्पर्धेचे आयोजन सुरू केले. यंदाही ते आयोजन केले जात असून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने महिला टी-२० स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे. या निमित्ताने शिवाजी पार्कच्या मैदानावर पुढील चार दिवस महिला क्रिकेटची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. खुद्द या स्पर्धेला आणि महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

राजावाडी क्रिकेट क्लब आणि दहिसर स्पोर्ट्स क्लब यांच्यात माहिम ज्युवेनाईल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर उद्घाटनीय सामना रंगणार असून उद्या २० फेब्रूवारीला सकाळी ८.३० वाजता राज ठाकरे या स्पर्धेचे उद्घाटन करतील, अशी माहिती माहिम ज्युवेनाईलचे अध्यक्ष विजय येवलेकर यांनी दिली.

महिला क्रिकेटला नवी उभारी मिळावी म्हणून आयोजित होणार्‍या या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला प्रकाश पुराणिक करंडकासह ५० हजार रुपयांचे रोख इनामही दिले जाणार आहे. उपविजेता संघ २५ हजार रुपयांचा मानकरी ठरले. तसेच उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून अनेक वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आल्याची माहिती सचिव सुनील पाटील आणि कोषाध्यक्ष महेश शेट्ये यांनी दिली.

या स्पर्धेत एकंदर १६ संघ बाद फेरीत खेळणार असून राजावाडी, दहिसरसह ग्लोरियस क्रिकेट क्लब, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टिंग युनियन, वेंगसरकर फाउंडेशन, जे. भाटिया स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, डी डीव्हीजन विजेता, पीडीटीएसए स्पोर्ट्स क्लब, फोर्ट यंगस्टर्स, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, बोरीवली क्रिकेट क्लब, सी डिव्हीजन विजेता आणि भारत क्रिकेट क्लब हे संघ आपले कौशल्यपणाला लावतील. पहिल्या दिवशी बाद फेरी, दुसर्‍या दिवशी उपांत्यपूर्व फेरी आणि तिसर्‍या दिवशी उपांत्य सामने खेळविले जातील. स्पर्धेची जेतेपदाची लढत शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिम ज्युवेनाईलच्या मैदानावर खेळविली जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages