मुंबई - डॉ. बाबासाहेब ठाकरे यांचे नाव घेवून सर्वच पक्ष राजकारण करतात. मात्र त्याच बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार 2018 पासून वितरित करण्यात आला नव्हता. यामुळे आंबेडकरी जनतेत नाराजी पसरली आहे. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास महाराज तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा विविध पुरस्काराने गौरवविण्यात येते. मात्र मागील चार वर्षांपासून जाहिराती काढून अर्ज मागवण्यात आले. पात्रता यादीसुद्धा तयार झाली. त्यानंतर विविध कारणास्तव हे पुरस्कार वितरित न झाल्यामुळे राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
राज्य सरकारने या चार वर्षात विविध विभागांचे विविध पुरस्कार जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देखील अनेक पुरस्कार सोहळे झाले. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार घोषित करण्यात आले नाहीत. त्यामुळे या पुरस्कारांच्या प्रतिक्षेत असलेल्या अर्जदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा दिनी या पुरस्कारासाठी बैठक लावल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ही बैठक होवू शकली नव्हती. वारंवार लांबणीवर जात असलेल्या या पुरस्कारांसाठी अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित दुपारी होणारी बैठक सायंकाळी संपन्न झाली.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, राज्य निवड मंडळाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पुरस्कार देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या सूत्रांनी दिली. सदर कार्यक्रमाची तारीख निश्चित झाली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा करून या कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment