Mumbai News - ‘टॉप टेन’ मालमत्ता कर थकबाकीदारांकडे १४७ कोटींची थकबाकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2024

Mumbai News - ‘टॉप टेन’ मालमत्ता कर थकबाकीदारांकडे १४७ कोटींची थकबाकी


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 'मालमत्ता कर' थकवणाऱया बड्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली आहे. याअंतर्गत आज (दिनांक १४ मार्च २०२४) २४ प्रशासकीय विभागातील १४२ बड्या थकबाकीदारांकडे करनिर्धारण आणि संकलन खात्याने वसुलीसाठी पाठपुरावा केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणाऱया मोठ्या थकबाकीदारांची आकडेवारी देण्यात आली आहे. या दहा मोठ्या थकबाकीदारांची महानगरपालिकेला देय असलेली थकबाकी ही सुमारे १४७ कोटी २४ लाख ७२ हजार १८ रूपये इतकी आहे. त्यापैकी काही थकबाकीदारांनी धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) महानगरपालिका अधिकाऱयांकडे सुपूर्द केले आहे. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Mumbai Latest News)

नागरिकांना विविध सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 'मालमत्ता कर' हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभाग अथक कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ हे संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ ची कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरु आहे. समाज माध्यमांद्वारे संपर्क करुन तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. करदात्यांना करभरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करणेबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे.

मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे जनजागृतीचा धडाका आहे. जनजागृती, वारंवार आवाहन, मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणाऱया मालमत्ता धारकांबाबत कठोर पावले उचलण्यास कर संकलन विभागाने सुरूवात केली आहे.

नागरिकांनी त्यांचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२४ पर्यंत तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, याकरिता अधिकारीवर्ग प्रत्यक्षात करदात्यांना भेटून त्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास प्रोत्साहित करत आहेत. नागरिकांना कर देयके विहित कालावधीत टपालामार्फत प्राप्त न झाल्यास महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा विभाग कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

करनिर्धारण आणि संकलन खात्याने आज २४ विभागात १४२ बड्या थकबाकीदारांकडे करवसुलीसाठी पाठपुरावा केला. त्यात ए विभागात (१), बी (७), सी (१), डी (४), ई (३३), एफ दक्षिण (१), एफ उत्तर (४), जी दक्षिण (१२), जी उत्तर (३), एच पूर्व (३), एच पश्चिम (७), के पूर्व (५), के पश्चिम (३), पी दक्षिण (६), पी उत्तर (४), आर दक्षिण (४), आर उत्तर (२), आर मध्य (५), एल (५), एम पूर्व (३), एम पश्चिम (९), एन (८), एस (५), टी (५) यांचा समावेश आहे.

दिनांक १४ मार्च २०२४ रोजीच्या टॉप टेन मालमत्ता कर थकबाकीदारांची आकडेवारी-

१. मे. एल एण्ड टी क्रॉसरोड ४१ कोटी ३८ लाख ८९ हजार ८३५

२. भारत डायमंड बोर्स २५ कोटी ८७ लाख ६८ हजार १७०

३. सीजुली प्रॉपर्टी लि. २४ कोटी ८९ लाख ६१ हजार ६९७

४. वर्मा मेडिसिन रिसर्च ट्रस्ट (ग्लोबल हॉस्पिटल) १६ कोटी ६४ लाख ४२ हजार ०९६

५. श्री डी. व्ही. सेठ एण्ड ऑदर्स (प्राईम मॉल) ११ कोटी ५० हजार ८५१

६. फिनिक्स मॉल १० कोटी ८२ लाख ८८ हजार १८०

७. हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड १० कोटी १५ लाख ९४ हजार ६५

८. गोदरेज ग्रीन होम प्रायव्हेट लिमिटेड १० कोटी ५७ लाख ४८ हजार ३८६

९. मुक्ता फाऊंडेशन ६ कोटी ६६ लाख १८ हजार १८९

१०. चंपकलाल ४ कोटी ८१ लाख १७ हजार ४५७

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad