Lok Sabha Election 2024 - निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2024

Lok Sabha Election 2024 - निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज


मुंबई - भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. (Mumbai suburb district ready for election)

लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, उपजिल्हाधिकारी शारदा पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुबई उत्तर- पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी अणुशक्तीनगर आणि चेंबूरचा समावेश लगतच्या मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात आहे.

२६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना -
मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या चार मतदारसंघांसाठी २० मे २०२४ रोजी मतदान होईल. त्यासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ६ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २० मे २०२४ रोजी मतदान होऊन ४ जून २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

७२ लाख २८ हजार मतदार -
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७२ लाख २८ हजार ४०३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ९४ हजार १८०, महिला मतदारांची संख्या ३३ लाख ३३ हजार ४२२ एवढी आहे. तृतीय पंथी मतदारांची संख्या ८०० एवढी आहे, तर परदेशी मतदारांची संख्या १६४४ एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ११३ आहे. सर्व्हिस मतदारांची संख्या एक हजार ६६ एवढी आहे. ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १ लाख १ हजार ६७३ एवढी आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या सात हजार ३५३ एवढी आहे. त्यात २७ सहाय्यक मतदान केंद्रे असतील.

मतदान प्रक्रियेसाठी मनुष्यबळाचे नियोजन -
मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि एव्हीएम युनिटचे नियोजन करण्यात आले. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, सावलीसाठी मंडप आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याचे ही जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी त्रिस्तरीय एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक विषयक विविध परवानगीसाठी विधानसभास्तरीय कार्यक्रमासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एकापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांतील कार्यक्रमाच्या परवानगीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोन लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमाच्या परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेवर देखरेखीसाठी फिरत्या पथकांसह एकूण २२४ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, माध्यमांमधील जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी असतील दहा निरीक्षक -
लोकसभेच्या या निवडणुकीसाठी एकूण दहा निरीक्षक असतील. त्यात सर्वसाधारण, खर्च निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था संदर्भातील देखरेखीसाठी निरीक्षक असतील. मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यासाठी या व्यक्तींना मतदारांना आवाहन करण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले. लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात असेल, तर मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विक्रोळी येथे असेल, अशी माहिती ही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad