लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने लढण्याची गरज - नाना पटोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2024

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने लढण्याची गरज - नाना पटोले

 

मुंबई - लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, याचा शोध लागला नाही. भाजपा सरकारच्या काळात देशातील सैनिक सुरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाहीत असा हल्लाबोल करत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नाना पटोले बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी २०१४ साली जनतेला भरमसाठ आश्वासने दिली, सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करू, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला दिडपट भाव देऊ, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू परंतु यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. उलट जीएसटीच्या माध्यामातून जनतेला १० वर्ष लुटले आहे. शेतकऱ्याच्या शेतात वीज नाही, पण शौचालयावर मोदीचा फोटो, खताच्या पिशवीवर मोदीचा फोटो झळकतो. १० वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही आणि आता पुन्हा मोदींच्या नावाने मते मागत आहेत. भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा.

खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून इतिहास रचला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व आता मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा काढली. या यात्रेतून त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी, महिला, तरुण, कामगार यांचे दुःख समजून घेतले व २५ गॅरंटी दिल्या आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करण्याचे आश्वासन दिले आहे. गरीब महिलांना दर वर्षाला १ लाख रुपये, तरुणांना प्रशिक्षणाची गॅरंटी, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार तसेच पेपरफुटीला लगाम घालणारा कायदा आणला जाईल अशी आश्वासने दिलेली आहेत. डॉ. प्रशांत पडोळे यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad