नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2024

नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला


अमरावती - अमरावतीतून भाजपाच्या तिकिटावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. भाजपाची सातवी यादी जाहीर झाली. त्यात अमरावतीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करण्याआधी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

‘एका छोट्या संघटनेला जिल्ह्यात पक्षाचं मोठं रूप देणं महत्त्वाचं होतं. याच पक्षाने आमदार आणि खासदारही दिला. आता मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मला या पक्षाचा राजीनामा देताना धाकधूक आहे. स्वत:च्या पक्षात काम करणं आणि त्यानंतर नवी इनिंग सुरू करणं हे आव्हानात्मक आहे. आता डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. आज माझे डोळे पाणावले आहेत, जे होणं साहजिक आहे.’’ असे नवनीत राणांनी म्हटले आहे.

खासदार नवनीत राणा यांना भाजपाने सातव्या यादीत अमरावतीतून तिकिट दिले आहे. नवनीत राणा बनावट जात प्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करावे असा निर्णय दिला. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्­हान देणा-या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे राणा यांच्या उमेदवारीसमोर अडचणी येत होत्या. त्याचबरोबर नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र भाजपाने उमेदवारी दिली आहे आणि त्यांना तिकिटही दिले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत (२०१९) नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. नवनीत राणा यांना भाजपाने तिकिट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही त्यांना पाडणारच असा निर्धारही बोलून दाखवला आहे. अशात आता अमरावतीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad