मुंबई - मुंबईत बोरिवली पश्चिम येथील कल्पना चावला चौक येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १६व्या मजल्यावरील बांबूची मचान खाली कोसळली. त्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एक कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. (part of the Scaffolding collapse)
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम, कल्पना चावला चौक, सोनी वाडी येथे एका २४ मजली इमारतीचे काम सुरु आहे. मंगळवार १२ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास १६ व्या मजल्यावरील बांबूची मचान कोसळले. ज्यामुळे चार कामगार जखमी झाले. याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, बोरीवली पोलिस आणि रुग्णवाहिका मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली. चारही जखमींना कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी चार पैकी तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर एक कामगार गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले. हा अपघात नक्की कसा घडला ? बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती का ? याचा तपास पोलीस आणि महापालिकेकडून सुरू आहे.
मृतांची नावे -
मनोरंजन समतदार, ४२ वर्षे, पुरुष
शंकर बैद्य, २६ वर्षे, पुरुष
पीयूष हलधार, ४२ वर्षे, पुरुष
गंभीर जखमी -
सुशील गुप्ता, ३६ वर्षे, पुरुष (आयसीयूमध्ये उपचार सुरु)
No comments:
Post a Comment