पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील संशोधन विभागामार्फत संशोधक तज्ञ व्यक्तीची समिती (संशोधन तज्ञ परिषद) गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून संशोधक व दुर्मिळ पुस्तकांचे संग्राहक रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी कळविले आहे.
बार्टी संस्था महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जातीच्या संदर्भात संशोधन करून अभ्यासपूर्व मांडणी द्वारा शासनास अहवालाच्या माध्यमातून धोरणात्मक शिफारशी करत असते. अनुसूचित जातीच्या संदर्भात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मानववंशशास्त्रीय पैलूंवर सातत्याने संशोधन होत असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रवर्गाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संवेदनशील विषय देखील हाताळण्यात येतात. समाजामध्ये मानवतेची आणि सर्वकष विकासाची क्रांती करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, आद्यक्रांतीगुरु-लहूजी साळवे, क्रांती अग्रणी - मुक्ता साळवे अशा समाज सुधारकांच्या विचारांचा, कार्यावर ऐतिहासिक संशोधन करून ते लिखित साहित्य जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.संशोधन कार्याच्या या प्रवासात अनेक टप्यांवर मार्गदर्शनाची गरज असते. संशोधन प्रस्ताव संशोधन पद्धती निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पैलूचे निर्देशांक तयार करणे, माहिती संकलनाची साधने मुलाखत अनुसूची/ प्रश्नावली, लक्ष गट चर्चा प्रश्न सूची, निरीक्षण सूची अशा साधनांची व संदर्भ साहित्याची विश्वासार्हता तपासणे व सत्यनिश्चिती करणे, अहवाल लेखन आणि अहवाल अंतिम करणे, अहवालाची वैधता करणे (validation) या महत्वाच्या बाबी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी तज्ञ आणि अभ्यासू व्यक्तीची संशोधन परिषद गठीत करण्यात आलेली आहे, त्यावर रमेश शिंदे यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment