मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2024

मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू


मुंबई - लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक आणि  मतदान प्रक्रिया ही अत्यंत महत्त्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेमध्ये थेटपणे सहभागी होऊन आपली कर्तव्यभावना व लोकशाहीप्रती असणारी निष्ठा अधोरेखित करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो !, असे गौरवोद्गार मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी काढले.

ते आज दादर पश्चिम परिसरातील शिवाजी मंदिर येथे आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मुंबई शहर जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-मुंबई दक्षिण मध्य' व '३१-मुंबई दक्षिण' या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विविध पाच ठिकाणी आज आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी महोदयांनी आवर्जून संवाद साधला. या संवादादरम्यान, जिल्हाधिकारी यादव यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले की, आपल्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही निवडणूक कार्यात सहभाग नोंदविला असेल, तर काही कर्मचाऱ्यांची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, सर्वांनीच ही त्यांची पहिलीच 'इलेक्शन ड्युटी' आहे, असे समजून प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात येणाऱ्या सर्व बाबी व सूचना अत्यंत लक्षपूर्वक समजावून घ्या व त्या बाबी काम करताना काटेकोरपणे अंमलात आणा. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे. जेणेकरून आपले मतदानविषयी कर्तव्य अधिकाधिक योग्य प्रकारे पार पाडता येईल, असेही यादव यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना आवर्जून नमूद केले. 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आज मुंबईतील विविध ५ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दादर पश्चिम परिसरातील शिवाजी मंदिर नाट्यगृह, शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रूग्णालयातील सभागृह, भायखळा पश्चिम परिसरातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, मुंबई सेंट्रल परिसरातील गिल्डरलेन महानगरपालिका शाळा संकुल आणि स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) नजीकचे भारतीय विद्या भवनचे सभागृह या ठिकाणांचा समावेश होता. या सर्व ठिकाणांना भेट देऊन जिल्हाधिकारी यादव यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. 

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी महोदयांसमवेत अपर जिल्हाधिकारी तथा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad