सरन्यायाधीशांनी सीबीआयचे कान टोचले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 April 2024

सरन्यायाधीशांनी सीबीआयचे कान टोचले


नवी दिल्ली - सीबीआयने राष्ट्रीय सुरक्षेशी आणि राष्ट्रविरोधी संबंधित गुन्ह्यांचा तपास करावा, असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देऊन सीबीआयचे कान टोचले. सीबीआयच्या स्थापना दिवसानिमित्त २० व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.

ते म्हणाले की, सीबीआयला सध्या मुख्य काम सोडून अन्य गुन्हेगारीचा तपास करायला सांगितले जात आहे. देशाची प्रमुख तपास संस्था असलेल्या सीबीआयचा विस्तार झालेला नाही. त्यांनी राष्ट्राशी संबंधित गुन्हेगारीचा तपास करायला पाहिजे. सध्या सीबीआयमध्ये अनेक अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर आहेत. सर्वांवर कामाचा मोठा बोजा आहे. कामाचा बोजा कमी करायला तपास प्रक्रिया डिजीटल बनवली पाहिजे. त्याची सुरुवात गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून केली पाहिजे. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता ते निकाली काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे चंद्रचूड म्हणाले.

ते म्हणाले की, सीबीआय सहित अन्य तपास यंत्रणांनी ऑनलाईन मार्गाने समन्स पाठवले पाहिजे. साक्षही आभासी पद्धतीने नोंदवली पाहिजे. त्यामुळे कागदपत्रे बनवण्यापासून होणारा विलंब टाळता येईल. न्यायिक प्रक्रिया सरळ होईल. याचा फायदा आरोपींना होऊ शकेल. त्यांना जामीन मिळताना विलंब होणार नाही. तसेच दूरवर राहणाऱ्या नागरिकांना न्याय मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे गुन्ह्याचे स्वरुप बदलत आहे. तपास यंत्रणांना आता मोठया आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad