ससून रुग्णालयात दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2024

ससून रुग्णालयात दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यूपुणे - ससून रुग्णालयात दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात गेल्या वर्षभरात ८ हजार ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात गैरप्रकार वाढत असून, प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांत गेल्या वर्षी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकारांतर्गत सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी मागविली होती. त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने उत्तर दिले आहे. (24 patients die every day in Sassoon Hospital)

२०२३ मध्ये सर्व सरकारी रुग्णालयांत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात राज्यात सर्वाधिक ८ हजार ८७५ मृत्यू ससून रुग्णालयात झाल्याची नोंद आहे. याबाबत घोलप म्हणाले, ‘ससूनचे प्रशासन रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याऐवजी भ्रष्टाचारावर भर देत आहेत. आता तर रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करावी. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे.’

‘ससून रुग्णालयाची सध्या रुग्णशय्येची क्षमता सुमारे १८०० आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ही नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त असते. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात दररोज सुमारे १८० रुग्ण दाखल होतात. याच वेळी बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे. दररोज रुग्णालयातून सुमारे १६० रुग्णांना घरी सोडले जाते. रुग्णालयात दररोज सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे,’ अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांतून रुग्ण ससून रुग्णालयात पाठविले जातात. त्याचबरोबर पुणे शहर आणि जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांतूनही गंभीर रुग्ण ससूनमध्ये पाठविले जातात.

ससूनमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांपैकी थेट दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. इतर रुग्णालयांतून दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के असून, त्यातील निम्मे रुग्ण हे ४८ तासांत दगावतात, असेही सूत्रांनी नमूद केले. अनेक खासगी रुग्णालये रुग्णाची स्थिती बिघडल्यानंतर अथवा त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर त्याला ससूनमध्ये पाठवितात. त्यामुळे असे रुग्ण दाखल केल्यानंतर ७२ तासांत त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक दिसते. रुग्णालयात वर्षभरात किती मृत्यू झाले यापेक्षा नेमका मृत्यूदर किती आहे, हे पाहायला हवे असे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad