घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग बेकायदा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2024

घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग बेकायदामुंबई - घाटकोपरमध्ये आज सायंकाळी ४.३० वाजता BPCL पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहे. NDRFची टीम घटनास्थळी पोहोचली असून लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु आहे. दरम्यान घाटकोपरमध्ये कोसळलेलं हे होर्डिंग बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे हद्दीत बेकायदेशीर होर्डिंग -
घाटकोपर छेडानगर येथे कोसळलेले १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभे होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती. मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय संबंधित कंपनीने होर्डिंग दिसण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने मे महिन्यात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली हाती. या दुर्घटनेमुळे पालिकेने रेल्वेसह संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली असून एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल - 
या घटनेची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्वीटर) सदर प्रकरणाची माहिती दिली. एक्स पोस्टमध्ये ते म्हणतात, "घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad