३५ टक्के मुंबईकरांचा जीव धोक्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

३५ टक्के मुंबईकरांचा जीव धोक्यात

Share This


मुंबई - मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. मुंबईकरांना नेहमीच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागतो. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत ३५ टक्के लोक पूरप्रवण क्षेत्राच्या २५० मीटर अंतरावर वास्तव्य करत असल्याचे धक्कादायक वास्तव पालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्पीय अहवालातून समोर आले आहे.

मुंबई सात बेटावर वसली आहे. मुंबईला समुद्रकिनारा लाभला असून समुद्र सपाटीपासून मुंबई कमी उंचीवर आहे. त्यामुळे मुंबईत हलक्या सरी बरसताचं सखल भाग पाण्याखाली जातात. मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मिठी नदी, दहिसर नदी ओव्हर फ्लो होते आणि नदी परिसरात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागते. नदी शेजारी राहणारे, समुद्र सपाटीपासून जवळ राहणारे ३५ टक्के मुंबईकर आहेत. याचाच अर्थ ३५ टक्के मुंबईकर पूरप्रवण क्षेत्राच्या २५० मीटर अंतरावर वास्तव्य करत असून अतिवृष्टीत याठिकाणी राहणाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचे बोलले जाते.

मुंबईत सुमारे २३०० मिमी पाऊस पडतो. यामध्ये अनेक वेळा कमी वेळात २०० ते ४०० मिमी पाऊस पडल्याचे प्रकार घडत असल्याने शहराला पुराचा धोका संभवतो. अशा वेळी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम महत्त्वपूर्ण ठरते. यामध्ये पुराचा सामना करण्यासाठी पर्जन्य जल खात्याकडून पर्जन्य जलवाहिन्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

तसेच सेंट पॉल रोड, वाकोला नदी, मोतीलाल नगर रोड, एमसी रोड, मरोळ भंडार, वांद्रे रेल्वे वसाहत यासारख्या पूरप्रवण क्षेत्रातील पूर कमी करण्यासाठी बॉक्स ड्रेनचा वापर वाढवण्यात येत आहे. यामुळे विद्यमान वाहिन्या, मोऱ्या आणि नाल्यांवरील भार कमी होऊन अतिवृष्टी झाल्यास पूरसदृश्य परिस्थिती टाळता येईल. विविध ठिकाणी बॉक्स नाले बांधण्यात येत आहेत.

उपाय -
- नाल्यांच्या ठिकाणी असणाऱ्या झोपड्यांमधील जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत.

- मिलन सबवे, प्रमोद महाजन गार्डन-सेंट झेवियर गार्डन दादर या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या.

- आयआयटीच्या तंत्रज्ञानाने पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपायोजना.

- दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभाट नद्यांवर एमबीआर तंत्रज्ञानावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages