नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या शेवटच्या दिवशी आलेले एक्झिट पोल आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर मार्केटबद्दल केलेल्या विधानांचा दाखला देत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकारच्या माध्यमातून ठरवून शेअर मार्केटबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आणि यासाठी खोट्या एक्झिट पोल्सचा आधार घेण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. शेअर मार्केटच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा घोटाळा असून याा संपूर्ण प्रकरणाची जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेअर मार्केट घोटाळ्याचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की अमित शाह यांनी आधी मे महिन्यात लोकांना शेअर्स खरेदी करण्याचे आवाहन केले आणि ४ जूननंतर आमच्या जागा ४०० पार होणार असल्याचे सांगत शेअर्सच्या किंमती वाढतील, असा दावा केला. ज्या चॅनलला शाह यांनी मुलाखत दिली होती त्याच चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनीही शेअर्सबाबतचे आवाहन केले. त्यानंतर १ जून रोजी खोटे एक्झिट पोल आणून शेअर मार्केटमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. मात्र ४ जून रोजी खरा निकाल आल्यानंतर सर्व शेअर्स पडले. या सगळ्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे तब्बल ३० लाख कोटी रुपये बुडाले आणि काही मोजक्या परदेशी गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला. हा सगळ्या एका मोठ्या कटाचा भाग होता असा घणाघाती आरोप राहुल गांधींकडून करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment