Mumbai News - वडाळा ते परळ जल बोगद्याचा ' ब्रेक - थ्रू ' यशस्‍वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2024

Mumbai News - वडाळा ते परळ जल बोगद्याचा ' ब्रेक - थ्रू ' यशस्‍वीमुंबई - अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याच्या जल बोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज (दिनांक २१ जून २०२४) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. जल बोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ) त्याचप्रमाणे अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसराला पुरेसा व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. (Mumbai News) (Break through of water tunnel)

जल बोगदा खोदकामादरम्‍यान मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे अशा प्रकारच्या खडतर आव्हानांचा मुकाबला करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुसऱया टप्प्याचे खोदकाम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. कोविड - १९ च्या कठीण कालावधीत देखील प्रकल्‍पाचे खोदकाम अविरतपणे सुरू होते. या जल बोगद्याचे खनन पूर्ण झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानबिंदू रोवला गेला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जल बोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याच्या जल बोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज (दिनांक २१ जून २०२४) करण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) महेश पाटील, प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) पांडुरंग बंडगर यावेळी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान ते प्रतीक्षा नगर दरम्यानच्या ४.३ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले. ०८ ऑगस्ट २०२२ रोजी हे काम पूर्ण झाले. तर प्रतीक्षा नगर ते परळ या ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याचे खोदकाम ०१ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे (rock fall) या विविध आव्हानांवर मात करत दुस-या टप्प्याचे खोदकाम यशस्वीरीत्या नियोजित वेळेत पूर्ण करण्‍यात बृहन्‍मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत नियोजित वेळेत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उत्‍कृष्‍ट नियोजन, कार्यक्षम व्‍यवस्‍थापन व तांत्रिक कौशल्‍यामुळे मुंबईकर नागरिकांना अखंड, सुरक्षित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. जगभरातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्‍ये मुंबईची पाणीपुरवठा व्‍यवस्‍था गणली जाते. पाण्‍याच्‍या वहनासाठी जल बोगदे बांधणारी बृहन्‍मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आहे. जलवितरण व्‍यवस्‍थेतील व्‍यवहार्य पर्याय म्‍हणून जल बोगद्यांचा वापर केला जात असून जल बोगद्यांद्वारे पाणी वहन केल्‍याने गळती व पाणीचोरीला आळा बसतो आहे. एकूण ९० किलोमीटर लांबीच्‍या प्रबलित सिमेंट काँक्रिट जल बोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्‍यात आता अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याची भर पडली आहे. मुंबईतील घराघरात पाणी पोहोचविण्‍यासाठी महानगरपालिकेची महाकाय यंत्रणा २४ तास राबत आहे. उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करुन मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
१) या जलबोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ), अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसरातील नागरिकांना सन २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

२) हा जल बोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून बोगद्याचा खोदकाम व्यास ३.२ मीटर आणि अंतर्गत सलोह काँक्रिटचे अस्तरीकरण झाल्यावर संपूर्ण व्यास २.५ मीटर इतका असणार आहे.

३) या प्रकल्प अंतर्गत तीन कूपकांचे (shafts) बांधकाम अंतर्भूत आहे. हेडगेवार उद्यान येथील १०९ मीटर, प्रतीक्षा नगर येथील १०३ मीटर आणि परळ येथील १०१ मीटर खोलीच्या तीनही कूपकांचे काम पूर्ण झाले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेने प्रकल्पांतर्गत रचलेले नवे विक्रम-
१) हेडगेवार उद्यान येथील ९६.१५ मीटर खोलीच्या कूपकाच्या प्रबलित सिमेंट काँक्रिटीकरण (आरसीसी) अस्तरीकरणाचे काम केवळ २९ दिवसात पूर्ण

२) जानेवारी २०२२ मध्ये एका महिन्यात ६०५ मीटर लांबीच्या जल बोगद्याचे विक्रमी खोदकाम पूर्ण

३) विविध अडचणींना तोंड देत एका दिवसात सर्वोच्च अशा ३४.५ मीटर लांबीच्‍या जल बोगद्याचे खोदकाम करण्यात यश

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad