Mumbai News - नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, पालिकेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2024

Mumbai News - नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, पालिकेचे आवाहनमुंबई - शहर आणि उपनगरांमधील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, इंद्रा नगर तसेच वडाळा ट्रक टर्मिनस येथील न्यू म्हाडा ट्रान्झिट कॅम्प भागातील कोकरे नाल्यातील गाळ उपसा करण्यात आला नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रकाशित झाले आहे. या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच नाल्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते आणि यंदा निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. वडाळा ट्रक टर्मिनस येथील न्यू म्हाडा ट्रान्झिट कॅम्प भागातील कोकरे नाल्यातील गाळ आणि तरंगता कचरा दिनांक २१ आणि २२ मे २०२४ रोजी काढण्यात आला आहे. तथापि, या नाल्यांमध्ये तरंगता कचरा आढळून आला असून तोसुद्धा काढण्याची कारवाई त्वरित करण्यात येत आहे, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Do not throw garbage in rivers, and drains) (Mumbai News)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून तर, विभाग कार्यालयांच्या वतीने लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट दरवर्षी निश्चित केले जाते. त्यानुसार, वार्षिक उद्दिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मेपर्यंत मोठ्या नाल्यातील ७५ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टानुरुप दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत विविध नाल्यांमधून १० लाख २२ हजार १३१ दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान म्हणजे दिनांक १ जूनपासून नाल्यांमधून १५ टक्के काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, दिनांक १ जून २०२४ ते दिनांक २१ जून २०२४ दरम्यान विविध नाल्यांमधून एकूण १ लाख १५ हजार ४७३ दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आलेला आहे. तर, पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.

नदी, नाल्यात कचरा किंवा राडारोडा टाकू नका -
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नाल्यातील गाळ काढण्याचे काम नियमितपणे केले जात आहे. पावसाळापूर्व काळात विविध भागांतील लहानमोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात आला आहे. तथापि, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचे आढळून येत आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा राडारोडा टाकल्यास नदी किंवा नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन जोरदार पावसावेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे एकप्रकारचे स्वत:हून ओढवून घेतलेले संकट ठरू शकते. त्यामुळे, नागरिकांनी नदी किंवा नाल्यात कचरा, राडारोडा टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad