वर्सोवा येथील ३ अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2024

वर्सोवा येथील ३ अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई

मुंबई - अंधेरी के पश्चिम विभाग अंतर्गत वेसावे (वर्सोवा) येथे अनधिकृत बांधकामे निष्कासन कारवाई मोहीम राबविण्यात आली. बांधकामाच्या प्रक्रियेत असलेल्या तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींवर निष्कासन कार्यवाही करण्यात आली. या इमारतींमध्ये सद्यस्थितीला कोणत्याही व्यक्तींचे वास्तव्य नव्हते. बांधकाम सुरू असणाऱया आणि बांधकाम पूर्ण झालेल्या अशा एकूण तीन इमारतींवर कार्यवाही करण्यात आली.  

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार तसेच के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या सूचनेनुसार ही निष्कासन कार्यवाही आज (दिनांक ३ जून २०२४) पार पडली. या कार्यवाही मोहिमेमध्ये अभियंते आणि कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस यांनी योगदान दिले. निष्कासन कार्यवाही झालेल्या जमिनीची मालकी राज्य शासनाची आहे. सागरी प्रभाव क्षेत्र (सीआरझेड) क्षेत्र अंतर्गत ही अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वतःहून पुढाकार घेत ही कार्यवाही केली. या बांधकामांना ‘काम थांबवा’ नोटीस देण्यात आली आहे. तसेच निष्कासन कार्यवाहीच्या आधीही या बांधकामांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार तीन इमारतींवर निष्कासन कार्यवाही करण्यात आली. निष्कासित केलेल्या तीन इमारतींमध्ये बांधकाम प्रक्रियेअंतर्गत एक इमारतीचा तळ मजला, एक इमारतीचा पहिला मजला तर बांधकाम पूर्ण झालेल्या एक पाच मजल्याची इमारत निष्कासित करण्यात आली. या कार्यवाहीत पोलकेलन, दोन जेसीबी मशीन, इलेक्ट्रिक ब्रेकर्स तसेच ७० कामगार आणि २० अभियंत्यांच्या मदतीने ही निष्कासन कार्यवाही पार पडली. 

वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याचे पत्र मच्छीमारांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने पाठवले होते. यानिमित्ताने के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना अनधिकृत बांधकाम आढळल्याने ही कार्यवाही मोहीम स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आली. 

बांधकाम सुरू असलेल्या आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांवर पोलिसांच्या मदतीने निष्कासन कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच आगामी कालावधीत पोलीसांच्या मदतीने निष्कासन कार्यवाही राबविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याच्या अनुषंगाने यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad