रस्‍ते कंत्राटदारांकडून ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2024

रस्‍ते कंत्राटदारांकडून ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल


मुंबई - मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून वेगाने कामे सुरू ठेवली आहेत. मुंबई महानगरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍ते खड्डेविरहीत आणि वाहतूक योग्‍य ठेवण्‍याकामी निष्‍काळजीपणा करणा-या विविध कंत्राटदारांवर महानगरपालिका प्रशासनाने बडगा उचलला आहे. खड्डे बुजविण्‍याकामी दिरंगाई करणा-या, प्रचलित नियमावलीनुसार रस्‍ते सुस्थितीत ठेवण्‍याकामी कुचराई करणा-या वेगवेगळ्या कंत्राटदाराना मिळून आतापर्यंत एकूण ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पावसाने उघडीप देताच कंत्राटदारांनी अतिरिक्‍त मनुष्‍यबळाचा वापर करून तातडीने खड्डे बुजवावेत, रात्रपाळीतदेखील कामे करावीत, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. 

सततच्‍या पावसामुळे रस्‍त्‍यांवर खड्डे पडतात किंवा दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍याची (Bad Patches) डागडुजी करावी लागते. पावसाळ्या दरम्‍यान रस्‍त्‍यांवर खड्डे पडल्‍यास ते बुजविण्‍याची कार्यवाही लवकरात - लवकर करावी. विविध पर्यांयाद्वारे खड्डे, दुरूस्‍तयोग्‍य रस्‍त्‍यांची तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर साधारणपणे २४ तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍याद्वारे व कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्‍यास दंडात्‍मक कारवाईचा इशारादेखील त्‍यांनी दिला आहे.    

मुंबईकर नागरिकांच्‍या सोयीसाठी रस्‍ते आणि वाहतूक विभागामार्फत एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, पावसाळापूर्व तयारीच्या कामांमध्ये, सर्व दुरुस्ती योग्य रस्त्यांच्या कामांसाठी एकूण १८ कंत्राटदारांची नेमणूक करण्‍यात आली आहे. महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्‍टिक पद्धतीने तात्काळ बुजवत आहेत. तथापि, महानगरपालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवर पावसाळ्यादरम्‍यान पडलेले खड्डे आणि दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांची डागडुजी कंत्राटदारांमार्फत विहित कालावधीत होत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून आतापर्यंत एकूण ५० लाख ५३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्‍यात खड्डे बुजविणाऱया कंत्राटदारांना मिळून २८ लाख ३० हजार रुपये, प्रकल्‍प कंत्राटदारांना मिळून २० लाख ४५ हजार रुपये आणि दोषदायित्‍व कालावधीतील कंत्राटदारांना मिळून १ लाख १८ हजार रुपये रकमेचा समावेश आहे. दिनांक १ जून २०२४ ते दिनांक २५ जुलै २०२४ या कालावधीतील हा दंड आहे.      

या दंडाच्या रकमेचा विभागनिहाय विचार करता शहर विभागातील कंत्राटदारांना ८ लाख ८५ हजार रूपये, पूर्व उपनगरांमधील कंत्राटदारांना ५ लाख ४८ हजार रूपये, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांना २४ लाख ८५ हजार रूपये आणि महामार्ग कंत्राटदारांना ११ लाख ३५ हजार रूपये दंड आकारण्‍यात आला आहे. त्‍यांच्‍या देयकातून ही रक्‍कम वसूल केली जाणार आहे. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, मुंबई महानगरात मागील काही दिवसात कमी वेळेत जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. ८ जुलै २०२४ रोजी एका दिवसात ३०० मिलीमीटरहून अधिक, ७ जुलै २०२४, १३ जुलै २०२४ रोजी एका दिवसात २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला. संपूर्ण जुलै महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. डांबरी रस्त्यांवर अधिक पाणी साचले तर रस्त्यांचा पृष्ठभाग उखडणे सुरु होते. ते लवकर दुरुस्त न झाल्यास खड्डे पडायला लागतात. या कारणामुळे पावसानंतर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, सर्व अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दररोज दौरे करावेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. रस्त्याची परिस्थिती नादुरुस्त होत असल्याचे अगदी लवकर शोधून काढले आणि ‘मास्टिक’ने दुरुस्ती केली तर खड्डे समस्येवर तोडगा निघू शकतो, या सर्व प्रकारांबाबत पावसाळापूर्व बैठकांमध्ये अभियंत्यांना अवगत करण्यात आले. रस्ता दुरुस्ती कामामध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे कंत्राटदारांनादेखील निर्देश देण्यात आले होते. यापुढेदेखील कंत्राटदारांनी कामात दिरंगाई केली तर दंडात्मक कारवाईबरोबरच अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल, असेही बांगर यांनी नमूद केले.          

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad