मुंबई - शीव (सायन) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केली आहे. त्यामुळे, शीव (सायन) उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि २.८० मीटरपेक्षा उंचीच्या वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे. तसेच दिनांक १७ जुलै २०२४ रोजी मोहरम सणानिमित्त वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागातून मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात नागरिकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी या भागातील मार्गांवरुन प्रवास करणे टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहरम सणाच्या निमित्ताने दरवर्षी माहीम रेती बंदर येथे ताजिया विसर्जित करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यंदाही अशाप्रकारच्या मिरवणुकीचे आयोजन होत असल्याने काही मार्गावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनी बुधवार, दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून गुरूवार, दिनांक १८ जुलै २०२४ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत या कालावधीत 'जी उत्तर' विभागातील 'टी जंक्शन' ते कला नगर, ६० फूट रस्ता, ९० फूट रस्ता, एस. एल. रहेजा मार्ग, माहीम कॉज वे या मार्गावरुन वाहन नेणे किंवा प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment