पालिका आणि रेल्वेमुळे वाचले गंभीर जखमी श्वानाचे प्राण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2024

पालिका आणि रेल्वेमुळे वाचले गंभीर जखमी श्वानाचे प्राण


मुंबई - कुर्ला स्थानक येथे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका श्वानाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मुक्या जिवाला वेळीच रूग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

कुर्ला स्थानक परिसरात आज (दिनांक १४ जुलै २०२४) दोन श्वानांना उपनगरीय रेल्वेने धडक दिल्याने एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या श्वानाला गंभीर दुखापत झाली होती. कुर्ला स्थानकातील उप स्थानक व्यवस्थापक रवी नांदुरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे या अपघाताची माहिती दिली. 

त्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मृत अवस्थेतील श्वानाला वाहनातून नेण्यात आले. तसेच स्थानकात जखमी झालेल्या श्वानाला मदत करण्यासाठी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या बाई सकरबाई दिनशॉ पेटिट ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी स्थानक परिसरात पोहचून ट्रस्टच्या परळ स्थित रूग्णालयात  जखमी श्र्वानाला दाखल केले. श्वानाच्या जिवाला निर्माण झालेला धोका वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर टळला. श्वानाला गरजेच्या वेळी तत्काळ मदत केल्याने रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.

श्वानासाठी संबंधित वैद्यकीय उपचारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे १९१६ या क्रमांकावर संपर्क साधून प्राण्यांशी संबंधित वैद्यकीय उपचारासाठी मदत मागण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्राण्यांना नजीकच्या केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संलग्न आहेत. तसेच सेवाभावी वृत्तीने या संस्थांचे स्वयंसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिक व प्राण्यांना मदत करत आहेत. तसेच नागरिकांना श्वानांशी संबंधित  तक्रारीसाठी ऑनलाईन पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना  https://vhd.mcgm.gov.in/register-grievance
या लिंकवर तक्रार अथवा सूचना दाखल करता येईल. 

Bmc and railway saved the life of injured dog

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad