उद्धव ठाकरेंचे मोदी, फडणवीसांना खुले आव्हान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 July 2024

उद्धव ठाकरेंचे मोदी, फडणवीसांना खुले आव्हान


मुंबई - आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. माझे नातेवाईक माझ्या विरोधात आहेत. हे सगळे सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो. आता एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, असा गंभीर इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिला. तर लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. आता विधानसभेत त्यांची उरली सुरली गुर्मीही उतरवतो असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
 
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना, यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडले. आता हे आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. मुंबई आणि धारावी अदानीला दिली जात आहे. हे सगळे दोन व्यापारी करत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपली सत्ता आल्यावर अदानीचे कंत्राट रद्द करू. मुंबईचा विकास करण्यासाठी महापालिका असल्याने एमएमआरडीए सुद्धा बंद करू असे ठाकरे म्हणाले.  

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले. अनेकांनी मी देशाला दिशा दाखवली असे सांगितले. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडे करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपावर हल्ला चढवला. केवळ घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते. आपल्या बुथमधून जास्तीत जास्त मतदान करून घ्या. आपले हिदुत्व यांच्यापेक्षा वेगळे आहे. हिंदू आणि मुस्लिमांनाही हे हिंदुत्व पटते. हिंदुत्वाचा भगवा झेंडा भगवाच राहू द्या. त्यावर मशालीचे चिन्ह लावू नका अशा सूचना ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या.  

आताही ज्या कोणाला जायचे असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचे असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर आव्हान देत आहे. मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे. लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. आगामी निवडणुकीसाठी मशाल चिन्हाचा प्रचार करा. शंकराचार्यांनी आपल्याशी गद्दारी झाली म्हटले आहे. याचा प्रचार करा अशा सूचना शिवसैनिकांना केल्या. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याला नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

उरली सुरली गुर्मी उतरवू - 
लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींना घाटकोपरमध्ये रोड शो करावा लागला. येत्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी प्रचाराला यावे तुमची उरली सुरली गुर्मीही उतरवू. मी थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होते ते सगळे मी केले. हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

भाजपाचे प्रत्त्युत्तर - 
उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजपाने प्रत्त्युत्तर दिले. मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांच्या भरोशावर मी त्यांना पाहून घेईल. तू राहशील नाहीतर मी राहील, अशी भाषा उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जर ही भाषा ऐकली असती, तर त्यांना काय वाटले असते, हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का, असा सवाल करत भाजप आरे ला कारे केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असेच काहीसे घडतेय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad