मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. विहार तलाव हा आज (दिनांक २५ जुलै २०२३) मध्यरात्री ३ वाजून ५० मिनिटांनी, तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. (Vihar, Modak Sagar lake started overflowing)
यापूर्वी गेल्याच आठवड्यात दिनांक २० जुलै २०२३ रोजी तुळशी तलाव, तर काल दि. २४ जुलै २०२४ रोजी तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून व ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ४ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गेल्या वर्षी म्हणजे सन २०२३ मध्ये २६ जुलै रोजी रात्री १२.४८ वाजता, सन २०२२ मध्ये ११ ऑगस्ट रोजी आणि सन २०२१ मध्ये १८ जुलै रोजी रोजी ओसंडून वाहू लागला होता.
तर मोडक सागर तलाव गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात अर्थात सन २०२३ मध्ये दि. २७ जुलै रोजी, सन २०२२ मध्ये १३ जुलै रोजी आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी ओसंडून भरून वाहू लागला होता. मोडक सागर तलावाची एकूण जलधारण क्षमता ही १२८९२.५ कोटी लीटर (१२८,९२५ दशलक्ष लीटर) आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ९६६३९.५ कोटी लीटर (९६६,३९५ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६६.७७ टक्के इतका आहे.
No comments:
Post a Comment