"एसटी पास थेट तुमच्या शाळेत" योजनेला उदंड प्रतिसाद... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2024

"एसटी पास थेट तुमच्या शाळेत" योजनेला उदंड प्रतिसाद...


मुंबई - शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना १८ जुन पासुन सुरू करण्यात आली. केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या जुन महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजार ने जास्त आहे. तसेच उत्पन्न २६ कोटी रुपयांनी वाढले आहे. 

विद्यार्थ्यांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी  यंदापासून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्याची योजना सुरू केली. तसे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण करू लागले आहेत. या योजनेला केवळ १२ दिवसांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला असून जुलै महिन्यात देखील अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करीत आहेत.
 
१५ जुन पासुन नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे " एसटी पास थेट तुमच्या शाळेत " हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad