छत्रपती संभाजीनगर - पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. त्यातून ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या मुलांची प्रकृती स्थिर आहे.
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवार असल्याने बिस्कीट वाटप करण्यात आले होते. बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. या घटनेनंतर सुमारे ५० विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी पाचोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केल्यावर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. शाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामधून राज्यात अनेक जिल्ह्यात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता केकत जळगाव येथे बिस्कीट वाटपातून विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment