मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मेळाव्यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंका असे आवाहन केले. आगामी विधानसभेची निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार त्यांनी केला. निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा. माझा त्याला पाठींबा असेल असे ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना - भाजपा माहायुतीमध्ये जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री असे ठरले होते. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे उमेदवार पाडले जायचे. असे महाविकास आघाडीमध्ये व्हायला नको. आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे. माझा त्याला पाठिंबा असेल. आजपर्यंत महाराष्ट्राच्या झुकवण्याची जो हिंमत करतो, त्याला आम्ही गाडल्याशिवाय सोडणार नाही. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्नच आमच्यापुढे नाही.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आपण लोकसभेला राजकीय शत्रूला पाणी पाजली. लोकसभेची निवडणूक संविधानाची रक्षणाची होती. लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. विधसनसभेची निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारी आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचायचे हाच आमचा निर्धार आहे. जे महाराष्ट्र लुटण्यास आले आहेत. आता एक तर तू राहशील किंवा मी राहील या जिद्दीने आपल्याला ही लढायची आहे. आजपासून या लढाईला सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे पुढे असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे. सरकारकडे बहुमत असताना हे विधेयक मंजूर का केले नाही? वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू मंदिराच्या जागा असतील तिथे काही चुकीचे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू. मराठा आणि ओबीसी समाजातील वादावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही राज्यात ओबीसी - मराठा वाद लावला आहे. देशातील आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिल लोकसभेत आणावे, आम्ही त्याला पाठिंबा देऊ.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वातंत्र्यदिनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे विधान केले. यावर बोलताना, भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य केले आणि हे त्यांच्यामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे म्हणत आहेत. बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरल्याने पंतप्रधान व सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला. अशी लोकशाही तुम्हाला परवडणार आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना उद्देशून केला. भूतकाळात पाहिल्यावर आम्हाला रामशास्त्री प्रभूने दिसतात.
राज्यातील महायुती सरकारबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळात चांगले काम केले. हे काम नागरिकांनी विसरून जावे म्हणून महायुती सरकारने ५० हजार दूतांची नेमणूक केली आहे. त्यासाठी प्रत्येकाला १० हजार रुपये दिले जाणार आहेत. योजना पोहचवणाऱ्या दूतांना १० हजार रुपये आणि लाडक्या बहिणांना १५०० रुपाये दिले जाणार आहेत. दूतांना पैसे देणे हा एका मोठा घोटाळा आहे. सरकारकडे पैसे नसले तरीही योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील अधिकारी महायुती सरकारच्या दडपशाहीला कंटाळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे ऐका नाही तर आपले दुसरे रूप दाखवावे लागेल अशी धमकी देतात. गद्दार हेच त्यांचे खरे रुप आहे. हे रूप मतदारांपर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment