लवकरच ऑनलाईन जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2024

लवकरच ऑनलाईन जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळणार


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म - मृत्यू नोंदणीकरीता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरु आहे. मुंबईकरांना जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र पुरवता यावेत, या हेतुने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा देखील सुरु आहे. सुधारित व अद्ययावत नागरी नोंदणी प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तसेच सहज, सुलभपणे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होवू शकतील. सबब, ही प्रणाली पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. तसेच याबाबत माध्यमांमध्ये देखील वृत्त प्रकाशित झाले आहेत. याअनुषंगाने जनमानसात गैरसमज होवू नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून खालीलप्रमाणे वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण करण्यात येत आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील जन्म - मृत्यू नोंदणीकरिता, महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाने दिनांक १ जानेवारी २०१६ पासून नागरी नोंदणी प्रणाली (Civil Registration System - CRS) चा अवलंब करण्यात आला आहे. भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून नागरी नोंदणी प्रणालीमध्ये दिनांक २४ जून २०२४ पासून सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांना सहज, सुलभ व वेगाने प्रमाणपत्र देता यावेत, यासाठी अद्ययावत वैशिष्ट्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात येत आहे.
या नवीन सुधारणांसाठी सद्यस्थितीत होत असलेल्या तांत्रिक कामकाजामुळे या प्रणालीतून जन्म - मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करतांना नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) मध्ये  नागरिकांना जन्म - मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त होत होती. सद्यस्थितीत सुधारित नागरी नोंदणी प्रणालीविषयक अद्ययावतीकरण सुरु असल्याने नागरी सुविधा केंद्रामध्ये देखील जन्म - मृत्यू प्रमाणपत्र  नागरिकांना मिळत नाहीत. 

एकूणच, नागरी नोंदणी प्रणालीमध्ये केंद्र शासनाच्या अखत्यारितील महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त यांच्या निर्देशाने सुधारणा होत असल्याची बाब लक्षात घेता, नागरिकांना जन्म - मृत्यू प्रमाणपत्र कसे प्रदान करावेत, सुधारित व अद्ययावत प्रणाली पूर्ण क्षमतेने खुली होताच लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला त्यातून कामकाजाची सुविधा मिळवून द्यावी, आदी बाबींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. 

याठिकाणी प्रकर्षाने नमूद करण्यात येते की, दिनांक २४ जून २०२४ नंतर जन्म - मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करतांना, नागरिकांनी त्यांचा अचूक ईमेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास महानगरपालिका विभाग कार्यालयांमधील (वॉर्ड) वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जन्म - मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येतील. 

सुधारित व अद्ययावत नागरी नोंदणी प्रणालीमध्ये नागरिकांना जन्म - मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे नागरिकांना नोंदणी कार्यालयास भेट देण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा नागरिकांच्या अत्यंत सोयीची आणि पारदर्शक राहणार आहे. तसेच, जन्म - मृत्यू प्रमाणपत्र  नोंदणीस विलंब होणार नाही. लवकरच सुधारित नागरी नोंदणी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबईकर नागरिकांना विनंती आहे की, कृपया जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांचे प्रणाली आधारित कामकाज सुरळीत होईपर्यंत कृपया सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad