राज्य सरकारी कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

११ ऑगस्ट २०२४

राज्य सरकारी कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर



मुंबई - राज्यातील तब्बल १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. बैठकीत राज्य सरकारी कर्मचा-यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचा-यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन देण्याची मागणी लावून धरली आहे.

कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली. तसेच नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धारही बोलून दाखविला. राज्यातील १७ लाख सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, यासंबंधीचा निर्णय आज मुंबई येथील समन्वय समितीच्या विस्तारीत सभेत झाला.

सरकारने आश्वासन पाळले नाही -
राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिले, ते अद्याप पाळण्यात आलेले नाही. सामाजिक आणि आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल, असे आश्वस्त करूनही त्या संदर्भातील नोटीफिकेशन निघू शकलेले नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी, शिक्षक चिंतेत आहेत, असे विश्वास काटकर म्हणाले.

सहनशीलता संपली -
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घेण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आता राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही विश्वास काटकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages