मुंबई - बदलापूर येथील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पोलिसांच्या एन्काऊंटवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. तर अशा प्रकारे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
विरोधकांचा आरोप -
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षानेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. फरार आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एन्काऊंटर प्रकरणातील वास्तव सगळ्यांसमोर आलं पाहिजे. त्याने गोळी मारली हे इतक सहज आहे का याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे.
गृहमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया -
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, आरोपी अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची एक तक्रार केली होती. दरम्यान याच्या चौकशीसाठी त्याला नेले जात होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर गोळी झाडली. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ गोळी चालवली आहे. अधिकृत घोषणा होयची आहे मात्र, जी काही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे त्याचा मृत्यू झालेला असावा. विरोधक हे प्रत्येक गोष्टीत प्रश्न उपस्थित करतात. या आरोपीला फाशी देण्याची मागणी वारंवार हेच विरोधी पक्ष करत होते. मात्र पोलिसांवर गोळी चालवली जाते, तेव्हा पोलीस आपले रक्षण करणार की नाही ? मला असं वाटत या विषयावर या प्रकारे राजकारण करणे हे अत्यंत चुकीचे आहे.
या संदर्भातील इतर बातमी -
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
बातमी वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा..
No comments:
Post a Comment