नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन

Share This

मुंबई - मुंबई सेंट्रल स्थित बाई य. ल. नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाला प्रशासनाने निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित बाई य. ल. नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने, रुग्णालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करून त्याबाबत तक्रार केली होती. रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने या प्रकरणी चौकशी केली. तसेच, 'कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती' यांनी देखील या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतली.

या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती' यांचेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, जेणेकरून या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करता येईल.

चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages