वरळीत राहुल गांधींच्या विरोधात निषेध मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2024

वरळीत राहुल गांधींच्या विरोधात निषेध मोर्चा


मुंबई - 'संविधान आमच्या हक्काचं, नाही काँग्रेसच्या बापाच, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, जब तक सुरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा, संविधान आमचे थोर काँग्रेसवाले चोर' अशा घोषणाबाजीने वरळीतील परिसर दुमदुमला. निमित्त होतं शिवसेनेतर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संविधान विरोधी वक्तव्यांच्या निषेधार्थ आंदोलनाचं. शिवसेने तर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्याचे नेतृत्व आमदार यामिनी जाधव, शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी केले. 

राहुल गांधी यांनी परदेशात बोलताना संविधानाचा अपमान केला असून आरक्षणाबद्दल त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी शिवसेनेने हा निषेध मोर्चा काढला होता. विधानानंतर संपूर्ण भारतात याचे पडसाद पडले. वरळी येथील बीडीडी चाळ ९४ समोरील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. हा निषेध मोर्चा आंबेडकर भवनापासून ते जांबोरी मैदानापर्यंत काढण्यात आला. आंदोलकांनी डोक्याला व हातात काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी, शिवसेनेचे शाखाप्रमुख, शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे संविधानिक पदावर असलेले व्यक्ती असून त्यांनी संविधान विरोधात बेजबाबदार आणि राष्ट्र विरोधी वक्तव्य करणं, याचा निषेध आहे. भारतात एक बोलायचं आणि परदेशात जाऊन दुसरं काही तरी बोलायचं, याचं राहुल गांधी यांनी जरा तरी भान ठेवले पाहिजे होते. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताबद्दल अफवा पसरवून नये. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसला त्यांची जागा नक्कीच दाखवू आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपण स्थापन करू, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी केले. 

याप्रसंगी, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक संतोष खरात, वरळी विधानसभा संघटक संजय गायकवाड आणि शिवसेना शाखा प्रमुख , शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad