पालिका आयुक्तांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2024

पालिका आयुक्तांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा



मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आता निवडणुकांच्या कामाला लागल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेऊन आज आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही दिले. या बैठकीमुळे लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे सप्ष्ट झाले आहे.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचा-यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलिस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी आढावा सादर केला.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीशी संबंधित मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. मतदारांची नाव नोंदणी करण्याची प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही गगराणी म्हणाले.

सप्टेंबर अखेर घोषणा?
मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात सक्रीय झाल्या असून पुढील काही दिवसांतच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते. पुढील ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरअखेर निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad