यंदा मधुमेह दिनाची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यंदा मधुमेह दिनाची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स'

Share This


मुंबई - मुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग या सारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिन निमित्ताने दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून मधुमेह आणि आहार विषयक जनजागृती राबविण्यात येणार आहे. मधुमेह दिनाची यंदाच्या वर्षीची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स' ही आहे. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मधुमेह संबंधित विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदाब, मधुमेह तपासणी केंद्र याठिकाणी समुपदेशन करतानाच जनजागृती मोहीमदेखील आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिस- (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५ टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम -
• आहार विषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यात सुरू असून त्यामध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक मधुमेही व रक्तदाब रूग्णांना सल्ला देण्यात आला.
• गत वर्षभरात विविध स्तरावर २५० आहार गट सत्र (Diet & lifestyle changes session) महानगरपालिका विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आले.
• ‘विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र’ (NCD Corners) - ऑगस्ट २०२२ पासून २६ रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आले. यात, ३० वर्षांवरील व्यक्तींचे व मधुमेह आणि रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले जाते. ऑक्टोबर २०२४ पर्यंत ४ लाख २५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संशयितांचा पाठपुरावा करून आवश्यकता असल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले .
• महानगरपालिकेच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व इतर दवाखान्यामध्ये एक लाखाहून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडवू शकतात. जेणेकरून मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊन हृदयरोग, पक्षाघात तसेच मूत्रपिंडाचे आजार टाळता येऊ शकतात.

‘जागतिक मधुमेह दिन” निमिताने नागरिकांनी घराजवळील योग केंद्राचा लाभ घ्यावा तसेच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा. नागरिकांनी महानगरपालिका दवाखाने आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना / पॉलीक्लिनिकमध्ये मधुमेह आणि रक्तदाब तपासणी व उपचारांकरिता असलेल्या सुविधांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत करण्यात येत आहे.

मधुमेह जनजागृती मोहिमेत खालील नमूद विविध प्रकारचे संदेश देण्यात येणार आहेत:

• ३० वर्षांवरील सर्व मुंबईकरांनी रक्तांमधील साखरेची व रक्तदाब चाचणी करणे आवश्यक.

• प्रक्रिया केलेले अन्न (processed food) खाणे टाळावे. त्यावरील सूचना (food Label) वाचावी.

• दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करणे.

• मिठाचा कमी प्रमाणात वापर करणे. ( ≤5g/day- साधारण १ छोटा चमचा).

• नियमित व्यायाम (कमीत-कमी अर्धा तास रोज चालणे) आणि योगा अभ्यास.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages