'नागराज मंजुळे' यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2024

'नागराज मंजुळे' यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव


मुंबई / पुणे - महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले लढा दिला. त्यांना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची गरज असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करत राहिले पाहिजे. जे लोक आपल्यासाठी लढत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ('Nagraj Manjule' honored with 'Mahatma Phule Samata Award')

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ आज फुले वाडा समता भूमी पुणे येथे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान यावेळी अभिनेते नागराज मंजुळे यांना रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी व्यासपिठावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार हेमंत रासणे, माजी खासदार समीर भुजबळ आदी मान्यवर तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी महापुरुषांना अभिवादन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले समता भूमी ही आपल्यासाठी शक्ती केंद्र असून आपली वैचारिक शक्ती वाढविण्यासाठी आपण या शक्ती केंद्राला भेट देत असतो.आजही फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी एवढे प्रयत्न करूनही समाजातील अंधश्रद्धा अद्याप दूर झालेली नाही. या महापुरुषांचे विचार घेऊन नागराज मंजुळे यांनी सामाजिक वारसा विकसित केला आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम लेखक, दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट निर्मितीतून केली असून त्याचं काम अविरत सुरु आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले पुढे म्हणाले की, नागराज मंजुळे हे ज्या प्रमाणे आपल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचप्रमाणे काम करणारे आमचा एक योद्धा हरी नरके हे होते ते आज आपल्यात नाही त्यांची मोठी उणीव आपल्याला जाणवते. त्यांनी फुले दाम्पत्याच्या सर्व साहित्याचे संशोधन करून ते सर्व साहित्य मुख्य प्रवाहात आणले. अनेक विरोध खोडून काढत सत्य समाजासमोर त्यांनी आणले. त्यांचे योगदान देखील अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात जी पहिली शाळा सुरु केली. त्याचठिकाणी राष्ट्रीय स्मारक विकसित करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महात्मा फुले स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच त्यातून या स्मारकांचा विकास करण्यात येणार आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून पुणे विद्यापीठात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आली आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आपण २०० मुलींसाठी एनडीची प्रबोधनी सुरु करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, गेल्या काही काळात मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही विरोध केला नसतांना देखील जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील जातीयवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील हे चित्र बदलणार की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला कुठलाही विरोध नाही. मात्र आपले न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल, लढावे लागेल ही लढाई अद्याप संपलेली नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अभिनेते नागराज मंजुळे यांनी पुरस्काराबाबत आभार मानत म्हणाले की, माझ्या दिशाहीन जीवनाला महात्मा फुले यांच्या विचारांनी मला मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आपण आज इथपर्यंत येऊ शकलो. महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले. आई वडिलांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. ही महापुरुष नसती तर आज आपण इतक्या गुण्या गोविंदाने राहू शकले नसतो. आपल सुखकर जीवन या महापुरुषांमुळे झाले असून त्यांच्या पुण्याईने आपण इथे आहोत. आपले जगणे आणि आपले हक्क समजण्यासाठी महात्मा फुले यांचे चरित्र वाचले पाहिजे असे मत अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
      
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांनी केले. तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर व महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी केले. याप्रसंगी मानपत्राचे वाचन प्रा. गौतम बेंगाळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad