अदानींसह पुतण्यालाही अमेरिकेने बजावले समन्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अदानींसह पुतण्यालाही अमेरिकेने बजावले समन्स

Share This


मुंबई - अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी व त्यांचा पुतण्या सागर यांना यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने त्यांच्यावरील आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी समन्स बजावले आहे. अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर अमेरिकेतील एक सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे तब्बल रु. २,२०० कोटींची लाच देण्याचा आरोप करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील अदानी यांच्या शांतीवन फार्म हाऊस आणि त्याच शहरातील भाच्या सागरच्या बोडकदेव येथील निवासस्थानावर समन्स पाठवण्यात आले असून त्यांना २१ दिवसांत एसईसीला उत्तर देण्यासाठी वेळ आहे. गौतम अदानी यांच्या निवासस्थानी (शांतीवन फार्म) आणि सागर अदानी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानावर (बोडकदेव हाऊस) हे समन्स पाठवण्यात आले असून आता नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांच्या आत (नोटीस मिळाल्याचा दिवस वगळता) दोघांनाही लाच दिल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस न्यूयॉर्क पूर्व जिल्हा न्यायालयाकडून २१ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आली होती.

अदानींना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही प्रतिसाद देण्यात अयशस्वी झाल्यास तक्रारीत मागितलेल्या मदतीसाठी तुमच्याविरुद्ध डिफॉल्ट निकाल दिला जाईल. तुम्हाला तुमचा उत्तर किंवा प्रस्ताव न्यायालयात दाखल करावा लागेल.’ न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेल्या आरोपानुसार गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह ७ जणांवर लाचखोरीचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. २०२० ते २०२४ दरम्यान सौरऊर्जेचे प्रकल्प मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिका-यांना सुमारे २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचे दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकल्पामुळे अदानींना २० वर्षांत दोन अब्ज डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे.

सर्व आरोप निराधार, अदानी ग्रुपची प्रतिक्रिया - 
या आरोपांवर अदानी समूहाने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आणि आरोपांचे खंडन करत निराधार असल्याचे म्हटले. या प्रकरणात समूहाने एक निवेदन जारी केले आणि लिहिले की यूएस न्याय विभागाने नुकतेच आरोप दाखल केले आहेत. दोषी सिद्ध होईपर्यंत आरोपींना निर्दोष मानले जाते. या प्रकरणी सर्व शक्य कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असे लिहिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages