मुंबई - मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरळीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. दिनांक ६ डिसेंबर रोजी होणारा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि देशातून मोठ्या संख्येने येतात. मध्य रेल्वेने शहरात येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
विशेष गाड्या -
मध्य रेल्वे दि. ४.१२.२०२४ ते दि. ८.१२.२०२४ पर्यंत १६ विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवत आहे ज्यात नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ८ सेवा, दादर ते नागपूर दरम्यान २ सेवा, कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान २ सेवा, आदिलाबाद आणि दादर दरम्यान २ सेवा तसेच अमरावती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान २ सेवा यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभाग दि. ५/६.१२.२०२४ च्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या देखील चालवणार आहे, ज्यात मुख्य मार्गावरील परळ ते कुर्ला/ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या गाड्या आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी/पनवेल दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.
हेल्प डेस्क आणि विशेष तिकीट बुकिंग काउंटर -
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे चोवीस तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. दि. ०५.१२.२४ ते दि. ०७.१२.२४ या कालावधीत अनारक्षित तिकिटे आणि ट्रेनच्या चौकशीसाठी चैत्यभूमी येथे दोन यूटीएस-सह- चौकशी काउंटर उघडण्यात आले आहेत. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत.
प्रवाशांसाठी मार्गदर्शन आणि सुरक्षा -
या स्थानकांवर प्रवाशांचे योग्य मार्गदर्शन व्हावे आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर येथे २२३, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १६६, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी २ पाळीमध्ये काम करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत, दादर येथे १२०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४० आणि कल्याण येथे ३० कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत.
अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक जीआरपी आणि ८० हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात करण्यात आले आहेत.
आरपीएफ/जीआरपी कर्मचाऱ्यांसह विशेष तिकीट तपासणी पथके/कर्मचाऱ्यांना आरक्षित डब्यासमोरील स्थानकांवर केवळ बोनाफाइड प्रवाशांच्या प्रवेशाची खात्री करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
गर्दी व्यवस्थापन -
दादर येथील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ८ मधील उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. दादर येथील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश/निर्गमन योजना तयार केल्या जातील. दादर येथील गर्दी सुरळीत व्हावी यासाठी मध्य पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर स्थानकावर “चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग”, “राजगृहाकडे जाण्याचा मार्ग” इत्यादी २१४ बॅनर लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांच्या वेळा असलेले बॅनर/स्टँड लावले जातील. मध्यवर्ती उद्घोषणा प्रणाली आणि स्थानक उद्घोषणाद्वारे विशेष गाड्यांबाबत वारंवार घोषणा केल्या जात आहेत.
विशेष वैशिष्ट्ये -
संबंधित ठिकाणी पिण्याचे पाणी, वॉटर कुलर, स्वच्छ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि पुरेशा भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्लॅटफॉर्म तिकीट देण्यावर तात्पुरती बंदी -
गर्दी लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू लोकांना दि. ०९.१२.२०२४ पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येत आहे. यामध्ये मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा, पुणे स्टेशन, सोलापूर स्टेशन आणि भुसावळ, बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोडचा इ. स्थानकांचा समावेश आहे.
पर्यवेक्षण आणि सुक्ष्म व्यवस्थापन -
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे दि. ०५.१२.२४ च्या १६.०० ते ०९.१२.२४ च्या ०८.०० वाजेपर्यंत वाणिज्यिक निरीक्षकांना चोवीस तास तैनात केले जातील.
गर्दीच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानकांवर अधिकारी तैनात केले जातील.
गुप्तचर अधिकारी गर्दीचे प्रमाण वाढल्यास आणि इतर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त गाड्यांसारख्या गरजा पडताळून पाहण्यासाठी गर्दीचे निरीक्षण करतील.
मध्य रेल्वेचे अधिकारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि हाताळण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत सहकार्याने काम करतील.
मध्य रेल्वे सर्वांना आवाहन करते की कृपया वैध तिकिटांसह प्रवास करा आणि सहप्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षित, आणि आनंददायी प्रवास देण्यासाठी रेल्वेला सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment